संवेदना फाउंडेशनद्वारा उपलब्ध सेवा -

संवेदना फाउंडेशनद्वारा सध्या गरजू व्यक्तींना वैद्यकीय किंवा शैक्षणिक क्षेत्रासाठी मदत केली जाते.

विद्यमान उपक्रम -

शैक्षणिक मदत

कोविड साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शालेय साहित्य, शाळा किंवा महाविद्यालयाचे शुल्क, वसतीगृहातील निवासाचे शुल्क भरणे अशक्य झाले आहे. अशा विद्यार्थ्यांना संवेदना फाउंडेशनद्वारा वस्तू वा आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली. संवेदनाच्या माध्यमातून आतापर्यंत पाच लाख पंचाऐशी हजार इतकी रक्कम मदत म्हणून देण्यात आली आहे.

वैद्यकीय मदत

सध्या डोंबिवलीतील आश्रय ट्रस्टमध्ये डायलिसिससाठी येणाऱ्या ४ गरजू रुग्णांना महिन्याभराच्या डायलिसिस उपचारांच्या खर्चातील निम्मा खर्च संवेदना फाउंडेशनद्वारा केला जातो. आतापर्यंत ७५ रुग्णांना ३००हून अधिक डायलिसिससाठी मदत करण्यात आली आहे. याशिवाय काही रुग्णांना अन्य उपचारांसाठीही मदत करण्यात आली आहे.

जनजागृती

समाजातील गरजूंची मोठी संख्या बघता त्यांच्या गरजेला पुरे पडणे संवेदनासारख्या नव्या, छोट्या संस्थेलाच काय पण शासनालाही अशक्य आहे. यामुळेच विविध आजारांबद्दलच्या प्रतिबंधात्मक उपायांविषयी जनजागृती करणे आम्हाला आवश्यक वाटले. यामुळेच 'जागवू संवेदना' हा वैद्यकीय तज्ञांच्या मुलाखतींचा व्हर्च्युअल उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत डॉ. जगदीश हिरेमठ (ज्येष्ठ हृदयशल्यविशारद) आणि डॉ. तुषार दिघे (ख्यातनाम मूत्रपिंडरोग तज्ज्ञ) यांच्या मुलाखती प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
यात पुढे मेडिक्लेमसारख्या सेवांबद्दल माहिती देणाऱ्या तसेच विद्यार्थी व पालकांना योग्य करिअरसंदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांच्या मुलाखतीही आयोजित केल्या जाणार आहेत.

आगामी उपक्रम -

  • वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करणे.
  • वनवासी विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च करणे.
  • नेत्रदान, अवयवदान, त्वचादान, देहदान यासंदर्भात जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.
  • संवेदना वार्षिक मेळावा आणि ‘खारीचा वाटा’ भेट प्रदान