संवेदना फाउंडेशन ही सेवाभावी संस्था आहे. समाजातील संवेदनशील व सक्षम व्यक्तींनी दिलेल्या यथाशक्ती अर्थसहाय्यातून गरजू व्यक्तींना मदत करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. मुख्यत्वे वैद्यकीय व शैक्षणिक कारणासाठी ही मदत दिली जाते. ही संस्था धर्मादाय आयुक्तांच्या ( चॅरिटेबल कमिशनर) कार्यालयात नोंदवलेली आहे.
डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिरच्या ८६साली १०वी झालेल्या विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप गट आहे. वेळोवेळी स्नेहसंमेलने, सहली या निमित्त ते भेटत असतात. २०१७ साली बॅचमधील उमेश बोडस या विद्यार्थ्याने ग्रूपवर आवाहन केले की त्याला किडनी फेल्युअरमुळे नियमित डायलिसिस करावे लागत आहे. यामुळे ज्याला शक्य आहे त्याने आर्थिक मदत करावी. यावर असे ठरले की एक निधी तयार करून त्यातून त्याला दरमहा मदत करावी. बॅचमधील सुमारे ६०-७० जणांनी याला प्रतिसाद देउन सुमारे पावणे तीन लाख रुपयांचा निधी तयार झाला.
व उमेशला दरमहा मदत करण्यास सुरुवात झाली. दुदैवाने पाच महिन्यांनी आजार बळावून त्याचे निधन झाले. उरलेल्या निधीचा वापर अशाच प्रकारे गरजूंना मदतीसाठी करण्याचे ठरले व त्याप्रमाणे यातून काही विद्यार्थांना मदत करता आली. मात्र हा निधी केवळ टिळकनगर शाळेच्या ८६साली १०वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असल्याने या धर्तीवर समाजातील इतर गरजूंसाठी मदतीचे काम करावे असा विषय महेश खरे यांनी मांडला. वृषाली पुंडले, मनोज फाटक, दिपाली तांबे, शशांक गारखेडकर, संजीवनी कुलकर्णी, हेमंत कयाळ यांनी ही कल्पना उचलून धरली. याबद्दल सविस्तर चर्चा झाल्या व १५ ऑगस्ट १९ रोजी वृषाली पुंडले यांच्या घरी झालेल्या बैठकीत संवेदना फाउंडेशन ही संस्था स्थापन करण्याचे ठरले. २७ ऑगस्ट २०१९ रोजी http://www.sanvedanafoundation.org रजिस्टर झाली.
डोंबिवलीत सामाजिक कार्यकर्ता व संस्था कार्यपद्धती सल्लागार शैलेश निपुणगे याची मदत घेण्याचे ठरले. ३० जानेवारी २०२० रोजी संस्था नोंदणीचा अर्ज ठाण्याला धर्मादाय आयुक्त कार्यालयात देण्यात आला. ६ मार्च २०२० रोजी धर्मादाय कार्यालयात पडताळणी होवून इंटर्नल नंबर मिळाला. यानंतर आलेल्या कोविड महासाथीच्या पहिल्या लाटेमुळे काम खोळंबले. १८ नोव्हेंबर २० रोजी नोंदणी होवून २० जानेवारी २१ रोजी संस्था नोंदणी प्रमाणपत्र मिळाले. १ मार्च २१ रोजी संस्थेचा पॅन नंबर काढण्यात आला. २७ मार्च २१ रोजी बॅंक खाते उघडून संवेदना फाउंडेशनच्या कामाला सुरुवात झाली. मनोज फाटक ( अध्यक्ष), वृषाली पुंडले (कोषाध्यक्ष), महेश खरे (सचीव) आणि दिपाली तांबे, शशांक गारखेडकर, संजीवनी कुलकर्णी, हेमंत कयाळ हे विश्वस्त अशी रचना झाली. संस्था नवीन असल्याने सुरुवातीला व्यक्तिगत संपर्कातून देणग्या मिळवून निधी संकलनास सुरूवात झाली. या कामास वेग आला असतानाच बुधवार दिनांक ३० जून २०२१ रोजी एक मोठा धक्का संवेदनाला बसला. मनोज फाटक याचे कोविड आजारामुळे अचानक निधन झाले. यामुळे खचून न जाता संस्थेच्या कामास सुरुवातीपासून सहकार्य करणाऱ्या सौ. पूनम खरे यांना विश्वस्त मंडळात घेण्यात आले. त्यांच्या वाणिज्य शाखेतील शिक्षण व अनुभवामुळे त्यांना कोषाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. मनोजच्या निधनानंतर वृषाली पुंडले या अध्यक्ष झाल्या. व्यक्तिगत अडचणींमुळे संस्थाकामात स्वपेक्षित सहभाग देता येत नसल्याने मार्च २०२२मध्ये शशांक गारखेडकर व हेमंत कयाळ यांनी विश्वस्तपदाचा राजीनामा दिला. ते कार्यकर्ते म्हणून संस्थाकार्यात यथाशक्ती मदत करणार आहेत. यानंतर विराज देशपांडे व मनोज वाळिंबे यांची विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली.